खारेपाट विभागात खळबळ
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील नारंगी येथील पुरातन भुवनेश्वर मंदिरातील शिवलिंगावरील चांदीच्या मुखवट्याची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरवाजाचे टाळे फोडून सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा हा मुखवटा चोरला आहे. याबाबतचे वृत्त असे की, अलिबाग तालुक्यातील नारंगी येथे स्वयंभू भुवनेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगावर 6 किलो वजनाचा चांदीचा मुखवटा बसविण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मंदिराचे पुजारी गंगाधर सदाशिव म्हात्रे हे मंदिर उघडण्यासाठी आले असता त्यांना मंदिराचा एक दरवाजा उघडाच असल्याचे दिसून आले. मंदिरात प्रवेश करताच दरवाजाचे टाळे तुटलेल्या अवस्थेत बाजूला ठेवण्यात आलेले दिसले. त्याच वेळी त्यांना शिवलिंगावर असलेला चांदीचा मुखवटा गायब असल्याचे दिसले. त्यामुळे मंदिरात दरोडा पडल्याचे लक्षात येताच त्यांनी पोयनाड पोलिसांशी संपर्क साधला. चोरीची घटना कळताच पोलीस निरीक्षक राहुल अतीग्रे हे आपल्या सहकार्यां सोबत घटनास्थळी हजर झाले. संपूर्ण परिसराचा त्यांनी तपास सुरू केला आहे. सीसीटिव्ही फुटेज तसेच श्वान पथकास पाचारण करून चोरट्यांचा तपास केला जात आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.