| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
‘फॉरेन्सिक सायन्स’ अलीकडच्या काळातील न्याय तपास प्रक्रियेतील एक आवश्यक भाग असल्याचे सांगून फॉरेन्सिक सायंटिस्ट क्रिमिनल केसमधील पुराव्यांचा वैज्ञानिक अभ्यास करतात आणि गुन्ह्याच्या जागेची पाहणी करून पुराव्यांची चौकशी व तपासणी करतात असे प्रतिपादन डॉ. साक्षी गौतम पाटील यांनी केले. जे. एस. एम. कॉलेजच्या नेचर क्लब तसेच प्राणीशास्त्र विभागातर्फे बुधवार, दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘फॉरेन्सिक सायन्स’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष व अलिबाग येथील कोकण एजुकेशन सोसायटीच्या चंद्रकांत हरी केळुस्कर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. साक्षी पाटील या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच फिजिकल सायन्ससारख्या केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या विषयांचा ‘फॉरेन्सिक सायन्स’मध्ये अंतर्भाव होत असल्याने विद्यार्थ्यांना यामधून नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकत असल्याचे डॉ. साक्षी पाटील यांनी पुढे सांगितले. फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकोलॉजि विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. साक्षी पाटील यांनी ‘फॉरेन्सिक सायन्स’ या फार परिचित नसलेल्या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत दिली.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.अॅड. गौतम पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘फॉरेन्सिक सायन्स’ या सारख्या नाविन्यपूर्ण विषयांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, त्यामधून असलेल्या नोकरीच्या संधींबद्दल जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाच्या नेचर क्लबच्या प्रमुख डॉ. मिनल पाटील यांनी दिली. यावेळी प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अद्वैत घाटपांडे, प्रा. सुनील आनंद तसेच विज्ञान विषयाचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.