मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला

80 कोटींची आठ हजार 476 किलो वजनाची चांदी जप्त

। मुंबई । वृत्तसंस्था ।

येत्या बुधवारी होणार्‍या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. या नाकाबंदीदरम्यान मानखुर्द पोलिसांनी शनिवारी वाशी चेकनाका परिसरात चेन्नईहून येणारा एक ट्रक अडवला. या ट्रकच्या तपासणीत आठ हजार 476 किलो वजनाची चांदी सापडली असून तिची किंमत 80 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रकच्या तपासणीत आढळून आलेली चांदी ही हाँगकाँग येथून चेन्नई येथील कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आली होती. घटना उघडकीस आल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तसेच अणुशक्ती नगर मतदार संघ 172 येथील भरारी पथकाला पाचारण करण्यात आले असून ते याप्रकरणी तपास करत आहेत.
मतदारांना आकर्षित करण्याकरिता त्यांना पैसा, भेटवस्तूंचे वाटप करण्यात येते. त्यामुळे, रोकड, दारू, भेटवस्तू आदींची वाहतूक केली जाते. हा प्रकार रोखण्याकरिता वाहनांची तपासणी केली जात आहे. मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधु घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी चेकनाका येथे नाकाबंदी लावण्यात आली. या नाकाबंदीदरम्यान चेन्नईहून मुंबईला येणारा ट्रक पोलिसांनी शनिवारी पहाटे पोलिसांनी अडवला आणि त्याची तपासणी केली. त्यावेळी, ट्रकमध्ये साडेआठ टन वजनाची चांदी आढळून आली. इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रकमध्ये चांदी आढळून आल्याने त्याची माहिती तात्काळ प्राप्तीकर विभाग व निवडणुक आयोगाच्या पथकांना देण्यात आली. तसेच, पंचनामा केल्यानंतर पुढील कारवाई करिता जप्त केलेली चांदी प्राप्तीकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

Exit mobile version