दिव्यांग मुलांच्या शाळेला गळती

वर्गखोल्यांमध्ये पाणीच पाणी; चिंताग्रस्त पालकांची शाळेला सुट्टी देण्याची मागणी

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली नगरपारिषदेने दिव्यांग मुलांंसाठी बांधलेल्या शाळेच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर नवे बांधकाम करण्यासाठी मशीनरी वापरून ठोकाठोकी केल्यामुळे स्लॅब, भिंतींना तडे गेले आहेत. पावसाळ्यात स्लॅब गळत असून, सर्वच वर्गखोल्यांमध्ये पाणी साठल्यामुळे बेंच, शाळेच्या वस्तुंचे मोठे नुकसान झाले. छताखालील पीओपी पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही, तर भविष्यात स्लॅब कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा शाळेची दुरूस्ती होईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. प्रत्येक मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण घेण्याचा अधिकार असतानाही दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांची दुरवस्था पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.



शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया दिव्यांग मुलांच्या शाळेला खोपोली नगरपरिषदेने दिव्यांग भवन विरेश्‍वर मंदिरसमोरील वरची खोपोली येथे बांधून दिले आहे. इमारत बांधल्यापासून कोणतीही दुरवस्था नव्हती. काही दिवसांपासून इमारतीवर दुसरा स्लॅब टाकण्याचे काम सुरू केले आहे. ठोकाठोकीमुळे तडे गेले आहेत. तर, ठेकेदार शाळेतील मीटरवरून कामासाठी वीज वापरत असल्याने अतिवापर केल्यामुळे शाळेची लाईट बंद असते. यासंबंधीची माहिती नगरपरिषदेला निवेदन पत्राद्वारे कळवूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.

वर्गखोल्यांमध्ये पीओपी कोसळले असून, इलेक्ट्रिकच्या वायर तुटल्या आहेत. सर्व खोल्यांमध्ये पाणी साठले होते. दिव्यांंग मुलांच्या शाळेची दुरवस्था झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी माजी नगरसेवक किशोर पानसरे, माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल, सामाजिक कार्यकर्ते शयाम कांबळे, विजय तेंडुलकर पोहोचलेे. त्यांनी शाळेची दुरवस्था पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर बांधकाम अभियंता अनिल वाणी, अविनाश गायकवाड यांना पालकांनी चांगलच सुनावलं.

अनेक अडीअडचणींवर मात करून दिव्यांग मुलांसाठी नगरपरिषदेने भव्य शाळा बांधली आहे. शाळा सुरू झाल्यापासून कोणतीही अडचण आली नव्हती. मात्र, वरच्या मजल्यावर शाळेचे काम सुरू झाल्यापासून इमारत गळत आहे. याबाबत नगरपालिकेत पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका सुभा पाटणकर यांनी केला आहे. दिव्यांग मुलांना आपल्यासारखे समजत नसल्यामुळे ते आपल्यासारखे वावरत नाही. भविष्यात स्लॅब कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा शाळेची दुरूस्ती होईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालकांनी सांगितले आहे.

Exit mobile version