। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील तत्कालीन कारागृह अधिक्षक सचिन चिकणे यांचा विशेष सन्मान होणार आहे. उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राज्य कारागृह अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. सचिन चिकणे यांनी कारागृह अधिकारी म्हणून 19 वर्षे सेवा केली आहे. 2016 ते 2017 च्या दरम्यान त्यांनी अलिबागमधील जिल्हा कारागृह अधिक्षक म्हणून सेवा केली आहे. कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत निधीसाठी पाठपुरावा करून 43 सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी कारागृहाच्या आवारात बसवून घेतले.
कैद्यांसाठी गांधी परीक्षा घेण्यात आली. आरोग्य शिबीराबरोबरच कैद्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी योग वर्ग तसेच कैद्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कारागृहात वाचनालय सुरु केले होते. दहशतवादी हल्लेखोर कसाबला मुंबईतील आर्थररोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम चिकणे यांनी अठरा महिने सक्षमपणे बजावले. त्यांच्या अथक प्रयत्नाने कल्याण-डोंबीवली महापालिकेकडून कल्याण कारागृहासाठी 14 एकर जागा मिळवली. सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील उपअधीक्षक ते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना महासंचालकाकडून सन्मानित केले जाणार आहे.







