भरधाव रिक्षाची मोटारसायकलला धडक; एकाचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी |

अज्ञात रिक्षा चालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालवून समोरून येणाऱ्या मोटार सायकलला जोरात धडक दिली. या धडकेत मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. तक्रारदार दत्तू पाटील (50), रा कळंबोली हे अशोक लेंगरे (42), रा. घणसोली यांच्यासह कळंबोली सर्कल ते टी पॉईंट जंक्शनकडे जाणाऱ्या रोडवर आपल्या मोटार सायकलने जात असताना अनोळखी रिक्षा चालकाने त्याचे ताब्यातील रिक्षा भरधाव वेगाने चालवून रस्त्याचे परस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती कि मोटारसायकल चालवणारे अशोक लेंगरे यांचा जागीच मृत्यू झाला तर तक्रारदार दत्तू पाटील यांचे डाव्या पायाचे हाड मोडले. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Exit mobile version