भरधाव डम्परची दुचाकीला धडक; दाम्पत्य जागीच ठार

| नेरळ | वार्ताहर |

भरधाव डम्परची धडक लागून दुचाकीवरुन प्रवास करणारे दाम्पत्य जागीच ठार होण्याची घटना कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे रविवारी (दि.16) सकाळी घडली.

जिते गावात राहणारे योगेश रामदास जाधव व योगिता योगेश जाधव हे  दाम्पत्य आपल्या गावातील चुलत बहिणीच्या लाखरण या घरी जाण्यासाठी म्हणून दुचाकी वरून भिवपुरीमार्गे सकाळी निघाले होते. भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरातील चिंचवली रेल्वे गेट येथे अलिकडे योगेश यांच्या दुचाकीला खदानीच्या डम्परने धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरून खाली पडलेल्या योगिताच्या अंगावरून  वाहनाचे  मागील चाक गेले. तर योगेश डंपरच्या चाकात अडकला. मात्र आपल्याच धुंदीत असलेल्या चालकाने  त्याला तसाच फरफटत नेले. यात योगिताच्या अंगावरून अवजड डम्पर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर पती योगेश देखील या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे स्थानिकांनी उपचारासाठी नेण्यात आले होते, परंतू त्याचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला.

योगेशच्या कमरेकडील भागावरून टेंम्पोचे चाक गेल्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी चालक हा डंपर रस्त्यातच उभा करून घटनस्थळाहून फरार झाला. त्यामुळे नागरिक देखील संतप्त झाले होते. अधिकची माहिती घेतली असता कर्जत शहराजवळ खदान असलेल्या चिरमाडे याचा तो डंपर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले. घटनेचा पंचांना करून त्यांनी दोन्ही मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले होते. तर चालकाला देखील ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं. योगेश जाधव याला दोन लहान मुले असून या दोन्ही नवराबायकोच्या मृत्यूनंतर ते दोघेही अनाथ झाले आहेत.

Exit mobile version