| पुणे | वृत्तसंस्था |
भरधाव ट्रकची पाठीमागून दुचाकीस जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. ही घटना खेड तालुक्यातील वराळे गावच्या हद्दीतील स्पिनी कंपनीजवळ बुधवारी (दि. 4) सकाळी सातच्या दरम्यान घडली. कविता देवकर (30) असे या अपघातात जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
कविता यांना लिफ्ट देणारा दुचाकीस्वार बालाजी राठोड (40) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी राठोड हे बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान आंबेठाण येथून त्यांच्या मोटरसायकल वरून पुढे वराळे गावाकडे जात होते. त्या वेळी कविता देवकर यांनी लिफ्ट मागितली. राठोड यांनी कविता यांना दुचाकीवर पाठीमागे बसवून आंबेठाण बाजूकडून वासुली फाट्याकडे जाण्याच्या प्रयत्न होते. त्या वेळी त्यांची दुचाकी वराळे गावच्या हद्दीतील स्पिनी कंपनीजवळ आली असता पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकची त्यांच्या दुचाकीस जोरात धडक बसली. या वेळी ट्रकच्या डाव्या बाजूचे पुढील चाक कविता यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक लोखंडे याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गिरणार हे याप्रकरणी तपास करीत आहेत.