प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी, जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्या व नव्याने स्थापित होणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शासकीय यंत्रणा प्रभाग रचनेच्या कामाला लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकामार्फत सुरू आहे. या ग्रामपंचायतींची निवडणूक कधी होणार, याकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार यादींचा कार्यक्रम जुलै महिन्यात पार पडला. त्यामुळे ऑगस्टमध्ये मतदान होण्याची अपेक्षा होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम संपल्यावर आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी हालचाल सुरु झाल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, महाड, पनवेल, खालापूर या चार तालुक्यांतील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या कार्यक्रमानुसार शासकीय यंत्रणा कामालादेखील लागली आहे.
पाच डिसेंबरपासून कामाला सुरुवात झाली आहे. संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करण्याची कामे सुरु झाली आहेत. त्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी झाल्यावर अभिप्राय नोंदवून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभार रचनेला व्यापक प्रसिध्दी करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 24 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींवर दृष्टीक्षेप
तालुका - ग्रामपंचायत संख्या - नावे
पेण - 01 - निधवली
महाड - 03 - मुमुर्शी, भोमजई, पिंपळकोंड
पनवेल - 01 - वहाळ
खालापूर - 02 - उंबरे, दुरशेत