फडणवीस तिसर्यांदा मुख्यमंत्रीपदी; एकनाथ शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 5) पद व गोपनियतेची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईत आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी निकाल लागल्यापासून गेली 12 दिवस उलटूनही मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू होता. निदान सहा महिन्यांसाठी तरी मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी शिंदेंची मागणी होती. परंतु, भाजपाने ती धुडकावून लावल्याने शिंदे तेव्हापासून नाराज होते. म्हणूनच शपथविधी लांबल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याच्या अखेरच्या मिनिटांपर्यंत शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? यावरून मोठे नाराजीनाट्य रंगले. शपथविधी सोहळा काही मिनिटांवर आला असताना अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाहीर करण्यात आले. त्यामुळे महायुतीमधील धुसफूस कायम असून, ती पुन्हा चव्हाट्यावर आली.
या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीत आणि राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय नेतेमंडळी, साधू-संत-महंत, उद्योगपती, बॉलीवूडमधील मंडळी आणि 40 हजार नागरिक उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकेर आणि आनंद दिघे यांना वंदन केले. तसेच राज्यातील जनतेप्रतिही कृतज्ञता व्यक्त केली.
… म्हणून शिंदें सरकारमध्ये
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड केलं. त्यांना 40 आमदारांनी साथ दिली. त्या बंडानं ते पक्षाचे निर्विवाद नेते झाले. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी पक्षावरील पकड आणखी मजबूत केली. सध्या तेच मोठे नेते त्यांच्या पक्षात आहेत. त्यामुळे शिंदेंनी स्वतः उपमुख्यमंत्रीपद न होता, अन्य कोणाकडे हे पद दिलं असतं, तर मग पक्षात आणखी एक सत्ताकेंद्र तयार झालं असतं. त्यामुळे शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता होती.
आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार?
येत्या आठवड्याभरातच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. प्रत्येक आमदार आपली वर्णी मंत्रिमंडळात लागावी म्हणून प्रयत्नशील आहे. भाजपा कोट्यातील मंत्रीपदे त्यांचे दिल्लीतील हायकमांड नक्की करतील, तर शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आपले मंत्री ठरवतील.
खातेवाटपावरुन होणार खडाजंगी
खातेवाटपावरून तीन पक्षात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, एकनाथ शिंदे यांना गृह, महसूल आणि नगरविकास पाहिजे, तर अजित पवार यांना अगोदर असलेली खाती म्हणजे अर्थ, सहकार, महिला व बालकल्याण खाती हवीत. मात्र, महायुतीतील भाजपाने निकालानंतर आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असून, शिंदे आणि पवारांच्या मागण्या कितपत मान्य होतात, हे आगामी काळात दिसून येईल.
आव्हानांचा डोंगर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारेवरची कसरत आहे. मात्र, 2014 सालचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. राज्यात शेतकरी, महिला, बेरोजगारी, उद्योग अशी बरीच आव्हाने नवीन मुख्यमंत्र्यांसमोर आहेत. यामुळे महाविकास आघाडी येणार्या हिवाळी अधिवेशनाची वाट पाहात असून, थंडीतही अधिवेशन तापणार एवढे निश्चित.
7 डिसेंबरपासून अधिवेशन
विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन 7 डिसेंबरपासून मुंबईत होणार असून, त्यात नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि यानंतर 15 व्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक 9 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबरदरम्यान नागपुरात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.