। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी (दि.2) सकाळी वारे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खैरपाडा ते पोही दरम्यानच्या अवघड अपघाती वळणावर पुन्हा एक गंभीर अपघात घडला. लोखंडी भंगार घेऊन जाणारा भरधाव ट्रक समोरून येणाऱ्या कारवर धडकला आणि भीषण अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली. या धडकेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. कारमधील प्रवासी सुखरूप वाचले. मात्र, गाडीत असलेल्या एका लहान मुलाच्या डोळ्याला मार लागून तो किरकोळ जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्गावरून लोणावळ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी मुरबाड-कर्जत हा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात आला आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या मते, या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत व धोकादायक वळणामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यातच या रस्त्यावर सूचना फलकांचा पूर्ण अभाव असल्याने बाहेरून येणारे वाहनचालक या धोकादायक वळणाचा अंदाज घेऊ शकत नाहीत. परिणामी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. याशिवाय, कर्जत-मुरबाड हा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनांना अरुंद मार्गावरून जावे लागते आणि अपघातांची संख्या वाढत चालली आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी प्रत्यक्षात अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.
नागरिकांनी मागणी केली आहे की, या वळणावर तातडीने मोठे चेतावणी फलक उभारावेत, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत वेळोवेळी कापावे आणि महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या अपघातातील जीवितहानी टळली असली तरी या घटनेने पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कर्जत-मुरबाड रस्त्यावर भरधाव ट्रक कारला धडकून पलटी
