तांबड्या केशरी रंगांची उधळण

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सह्याद्रीच्या डोंगर रांगा, विपुल वनसंपदा लाभलेल्या रायगड जिल्ह्यात विविध प्रकारची फळफुल झाडे आहेत. जिल्ह्यातील डोंगर रांगा, रस्त्याच्या कडेला माळरान व जंगल आदी ठिकाणी फुलांनी बहरलेली पळसाची झाडे दिसत आहेत. जणूकाही तांबड्या व केशरी फुलांचा रंगोत्सव येथे सुरू झाला आहे असे वाटते. यामुळे सामान्य नागरिकांसह निसर्ग अभ्यासक देखील सुखावले आहेत. पर्यटक देखील हा रंगोत्सव पाहण्यासाठी आवर्जून येथे थांबतात. आणि डोळे भरून या फुलांचा आनंद घेतात.

फुलांनी बहरलेले ही झाडे अनेक पशुपक्षांना खाद्य व आश्रय देतात. त्यामुळे येथे विविध पक्षांचा किलबिलाट असतो. जैवविविधता देखील बहरते. निसर्ग व पक्षी अभ्यासकांना ही पर्वणी आहे. हा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक देखील याठिकाणी निरीक्षणासाठी आवर्जून येत असतात.

फ्लेम ऑफ द फॉरेस्ट
पळसाचे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल केशरी रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपुर्ण झाड पेटल्या सारखे दिसते. ब्रिटिशांनी हे नाव दिले असल्याचे बोलले जाते. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, पॅरट ट्री, पलाश, पळस अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा पळस वृक्ष सध्या रानावनात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तांबड्या भगव्या रंगाच्या फुलांनी बहरलेला पळस वृक्ष सह्याद्रीच्या परिसराला लाभलेला जणू एक दागिनाच आहे.
अनेक उपयोग
पळस ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाता एवढी रुंद व जाड असतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी या पानाचा वापर होतो. उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतुत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात, तर महाराष्ट्रात हिवाळ्यात (डिसेंबर-जानेवारी) फुले येतात. या फुलांचा उपयोग पूर्वी रंग करण्यास होत असे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे.
Exit mobile version