| आगरदांडा | प्रतिनिधी |
रायगड मेडिकल असोसिएशन व जंजिरा मेडिकल असोसिएशन मेयर कम्पनी यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड कल्याणी हॉस्पिटलमध्ये संगणकाव्दारे मोफत अस्थि खनिज घनत्त्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 130 नागरिकांनी व डॉक्टरांनी या तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी जंजिरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, डॉ. राज कल्याणी, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. अमित बेनकर, डॉ. हितेश जैन, डॉ. सुनील पटेल, मंगेश पाटील, रवींद्र नामजोशी, वसीम पेशिमाम आदींसह डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी डॉ. राज कल्याणी मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की, शरीरात कॅल्शियम असणे जरुरी आहे. कॅल्शियम वाढण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या, अंडी, मच्छी हे पदार्थ जेवणात आले पाहिजेत. तसेच हाडे मजबूत करण्यासाठी रोज सकाळी चालणे, सायकल चालवणे, जॉगिग करा, नियमितपणे वजन उचलण्याचे व्यायाम केल्यास हाडांची घनता वाढू शकते. पण, धूम्रपान, मद्यपान, थंड पेये टाळणे आवश्यक आहे.