पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैशाली दळवी यांच्या पाककृतीला प्रथम क्रमांक
| आगरदांडा | प्रतिनिधी |

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन मुरुड शहरातील माळी समाज हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी वादी काँग्रेस मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंढे, माजी सभापती स्मिता खेडेकर, महिला अध्यक्षा मृणाल खोत, मुग्धा दांडेकर, वृषाली म्हात्रे, प्रमिला माळी, कुक-धर्मेंद्र सिंग, माजी नगरसेवक संजय गुंजाळ, जुईली गुंजाळ, विजय पैर, विश्‍वा वर्तक, माजी सभापती अशिका ठाकूर, माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन, योगेंद्र गोयजी आदी मान्यवर उपस्थित होते.

या पाककला स्पर्धेसाठी मुरुड शहरामधून 24 महिलांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या महिलांनी विविध पाककृती तयार केल्या होत्या. या पाककला स्पर्धेत ‘केळफुलाची वडी’ बनवणार्‍या वैशाली दळवी यांना प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आले. आमरसाचे मोदक बनवणार्‍या वर्षा भोय यांना द्वितीय, तर फणसाचे वडे बनवणार्‍या प्रेरणा वाणी यांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. ओव्हन, वॉटर प्युरिफायर व मिक्सर व सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. तसेच ज्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यांनासुद्धा भेटवस्तू देण्यात आल्या.

महिलांनी बनवलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी व त्यांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने आम्ही पाककला स्पर्धा भरवत असल्याचे प्रतिपादन मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी केले. या स्पर्धेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

Exit mobile version