मुरुड तहसीलदारांना दिले निवेदन
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचा नगराध्यक्षाचा कालावधी 29 डिसेंबर 2021 ला संपला आहे. तेव्हापासून नगरपरिषदेने नागरिकांकरिता आवश्यक असणारा रहिवासी दाखले बंद केल्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रहिवासी दाखले सुरू करण्याकरिता मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांना मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी निवेदन दिले.
यावेळी मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, महिला अध्यक्ष अॅड. मृणाल खोत, अजित गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात मुरुड शहरातील नागरिकांना नगरपरिषद अध्यक्ष किंवा मुख्याधिकारी यांच्या सहीने रहिवासी दाखले दिले जात होते, परंतु काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यामुळे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे त्यांचे सहीने सदर रहिवासी दाखला देण्यास नकार देत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, त्यांना नाहक मनस्ताप होत असल्याचे म्हटले आहे. तरी तहसीलदारांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित मिटींगद्वारे विचार विनिमय करुन त्यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.