। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अनुजा जायले ही विद्यार्थिनी नुकतीच आपल्या घरी परतली आहे. मुलगी सुखरूप घरी परतल्यानंतर पालकांचा आनंदाचा अश्रूंचा बांध फुटला. दरम्यान, अनुजाने युक्रेनमधून सुखरूप मायदेशी परत आल्याने तिच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.
मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी अनुजा अभिजित जायले ही तरुणी डिसेंबर 2021 मध्ये युक्रेनमध्ये गेली होती. तेथील प्रथम वर्गासाठी विणीतसिया युनिव्हर्सिटी युक्रेन येथून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. अनुजा ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, तेथून 300 कि.मी. अंतरावर युक्रेन-रशिया या सैनिकांत युद्ध सुरू आहे. दरम्यान, युद्ध सुरू झाले, त्यावेळी ती आपल्या युनिव्हर्सिटीत उपस्थित होती. आम्हाला लगेच बॅग भरून तयारीत राहण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर अधिकच धोका वाढल्याने आम्हाला एका बंकरमध्ये हलवण्यात आले, तिथे सुरुवातीला खाण्याची सोय उपलब्ध नव्हती, तर पाय ठेवायला पण जागा नव्हती असा वाईट अनुभव अनुजाने सांगितला.
रोमानिया येथे आणले असता तिथल्या सरकारी सैन्यांनी आमची चांगली सोय केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, भारत सरकारकडून मिशन गंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणण्यात येत होते. आम्ही सर्वात आधी येऊनसुद्धा नंतर आलेल्यांना पहिले घेत असल्याने आवाज उठविल्याचे अनुजाने सांगितले. यानंतर मुलींना पहिले घेण्यात आल्यावर आम्ही मित्र-मैत्रिणी विखुरले गेलो होतो. परंतु, आज मी सुखरुप घरी पोहोचले असल्याचे अनुजाने सांगितले.
मुलांच्या शिक्षणाचे काय?
अनुजासारखेच हजारो विद्यार्थी डॉक्टरीकीचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले होते. परंतु, युद्धजन्य परिस्थिती कधी निवळेल हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे मुलांचा पुढील शिक्षणाची आम्हाला चिंता आहे. भारत सरकारने अशा विद्यार्थ्यांच्या अर्धवट राहणार्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी भावना अनुजाच्या कुटुंबियांनी बोलून दाखविली.