विविध विकास कार्यकारी सोसायटीवर सर्व संचालक बिनविरोध
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आघाडीची आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाची सहकारी सेवा संस्था म्हणून ओळख असलेल्या नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनेक वर्षे नेरळ सोसायटीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असून, यावेळीदेखील शेकापने वर्चस्व राखले आहे.
नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी तालुक्यातील महसुली उत्पन्न मिळविणारी सेवा संस्था असल्याने या सोसायटीवर वर्चस्व मिळविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने नियोजनबद्ध प्रयत्न केले. निवडणूक जाहीर झाल्यावर आपला परंपरागत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन नामनांकन अर्ज दाखल केले. त्यावेळी मागील संचालक मंडळामध्ये एकमेव संचालक असलेल्या शिवसेना पक्षाकडून सर्व 13 जागांसाठी निवडणूक लढविण्याची रणनीती आखली गेली होती. निवडणूक सर्व ताकदीने लढविण्यासाठी शिवसेनेने सर्व जागांवर अर्जदेखील सादर केले होते. मात्र, मतदार हे शेतकरी कामगार पक्षाकडे सर्वाधिक असल्याने आणि सेवा संस्थेकडून शेतकर्यांसाठी पीक कर्ज तसेच अन्य योजना सातत्याने राबविण्यात येत असल्याने शेकापच्या पॅनेलचा विजय होणार हे जवळपास नक्की होते. तरीदेखील शेकापच्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी सहकार क्षेत्रात निवडणुका नको, अशी भूमिका घेतली. त्यामुळे नामांकन अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत शिवसेनेने आपल्या उमेदवार यांचे अर्ज मागे घेत निवडणूक बिनविरोध केली.
नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या सर्व 13 जागा बिनविरोध झाल्या असून, शेतकरी कामगार पक्षाने आपल्या मित्र पक्षाच्या साथीने या सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. शेकापचे 13 पैकी आठ आणि मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन असे 11 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. तर, शिवसेनेचे दोन सदस्य बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीत बिनविरोध संचालक झालेल्यांमध्ये मावळते अध्यक्ष राजेंद्र हजारे, उपाध्यक्ष राजेंद्र विरले तसेच विष्णू कालेकर आणि सावळाराम जाधव यांचा समावेश आहे.
बिनविरोध निवडलेले संचालक
सर्वसाधारण जागा ः विष्णू कालेकर, राजेंद्र हजारे, वैभव भगत, रवींद्र झांजे, नामदेव तरे, यशवंत कराळे, सावळाराम जाधव, शशिकांत मोहिते. नागरिकांचा मागासप्रवर्ग- राजेंद्र विरले, महिला सर्वसाधारण- अर्चना शेळके, कुंदा सोनावळे, अनुसूचित जाती- संजय शिंदे, भटक्या जाती/जमाती- धोंडू आखाडे
वारे सहकारी सेवा संस्थेवर शेकापचे वर्चस्व
कर्जत तालुक्यातील वारे विविध कार्यकारी आदिवासी सोसायटीवर शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा वर्चस्व मिळविले आहे. या सोसायटीमधील सर्व 13 जागांवरील निवडणूक बिनविरोध झाली असून, तेथे शेकापचे नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत.
बिनविरोध निवडून आलेले संचालक
सर्वसाधारण आदिवासी ः रामदास पादीर, मंगल पारधी, हरिभाऊ पाटील, शिवाजी कडाळी, चहू केवारी, राजाराम पारधी, बिगर आदिवासी सर्वसाधारण ः हरिभाऊ म्हसे, शिवाजी देशमुख, महिला सर्वसाधारण आदिवासी ः मामी पारधी, ज्योती शिंदे, अनुसूचित जाती ः बबन भालेराव , नागरिकांचा मागासप्रवर्ग ः लक्ष्मण राणे, भटक्या जाती ः अरुण जोशी