भविष्यात सार्वजनिक सुविधांसाठी जागा आवश्यक; शासनाकडे पुनर्विचाराची मागणी
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
तालुक्यातील भाताण गावात ॲमिटी विद्यापीठासाठी 15 एकर आकारीपड जमीन देण्याच्या शासन निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच दीपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, अस्मिता काठवले, अरुणा गाताडे, रसिका भोईर यांच्यासह माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत अनेक ग्रामस्थांनी संबंधित जमीन वर्षानुवर्षे स्थानिक शेतकरी कसत असून त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गावठाण विस्तार, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील सार्वजनिक सुविधांसाठी ही जागा आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनावर थेट आरोप करत भूमिपुत्रांच्या हक्काची जमीन खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार आम्ही कदापिही सहन करणार नाही, असा इशारा दिला. विशेष म्हणजे जरी सदर जमीन कागदोपत्री आकारीपड दाखवण्यात आली असली तरी अनेक शेतकरी वर्षानुवर्षे ती जमीन कसत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचा मुद्दा ग्रामसभेत जोरदारपणे मांडण्यात आला.
सन 2023 पासून गावठाण विस्तारासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीमार्फत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मात्र, ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून खासगी विद्यापीठाला जमीन देण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामसभेत शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. तसेच पुढील पाठपुराव्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने कोर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कमिटी संबंधित शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदने देणार असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनाचा इशारा
आठ दिवसांत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशाराही काही ग्रामस्थांनी यावेळी दिला. गावाच्या हक्काची जमीन वाचवा अशा घोषणांनी ग्रामसभा परिसर दणाणून गेला होता. भाताणमधील या विषयामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून येत्या काळात हा प्रश्न अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






