ज्ञानगंगा ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
| कोर्लई | प्रतिनिधी |
अलिबागच्या ज्ञानगंगा शिक्षक विद्यार्थी कल्याणकारी ट्रस्ट’ला दोन वर्षे पूर्ण झाली असून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग येथील आरसीएफच्या क्रीडासंकुल परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अर्धमॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांसहित शिक्षकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यावश्यक आहे. अशा स्पर्धांमुळे सराव वाढून त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड आणि सातत्य टिकून राहते. धावण्याच्या व्यायामातून तंदुरुस्त राहून, शारीरिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासह सुदृढ विद्यार्थ्यांची पिढी घडविण्यासाठी सदर स्पर्धा आयोजित केल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.
विविध पाच गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दोनशेहून अधिक विद्यार्थी, तर साठहून अधिक शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये छोटा आणि मोठा गट, मुली, पन्नास वर्षांहून कमी वयाचे शिक्षक तसेच पन्नास वर्षांहून अधिक वयाचे शिक्षक, शिक्षिका यावेळी स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाल्याचे दिसून आले. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजयी स्पर्धकांसह दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ आकर्षक ट्रॉफी, तर सहभागी स्पर्धकांनाही प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे अध्यक्ष वैभव पिंगळे, उपाध्यक्ष प्रतिभा पाटील, सचिव सुबोध पाटील, खजिनदार अजित हरवडे, प्रमुख सल्लागार प्रमोद भोपी, कार्यकारी मंडळ सदस्य महेश कवळे, जयवंत वाणी, दयानंद अंजर्लेकर, नित्यनाथ म्हात्रे, उमेश ठाकूर, विनायक भोनकर, सुभाष मोकल, मनिषा अंजर्लेकर, विजय गुरव, निलेश तुरे, विश्वास पाटील, ज्योती घरत, संजय पोईलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक शिक्षक संघ रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, नरेंद्र गुरव, सुनील पाटील, विलास पाटील, रवींद्र थळे, प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, दीपक पाटील, अनिल नाईक, संदीप पाटील, दिलीप झावरे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.






