ज्येष्ठांसह दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व 85 वर्षांवरील मतदारांसाठी शुक्रवारी (दि.15) गृहमतदानाची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक मतदारांनी घरीच मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जिल्ह्यातून मतदारांनी स्वागत करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात 73 उमेदवार आहेत. एकूण 24 लाख 88 हजार 788 मतदार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 13 हजार 191 दिव्यांग व 85 वर्षांवरील 35 हजार 863 मतदार आहेत. या मतदारांमधील काही मतदारांना मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता असते. मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदान प्रक्रिया राबविण्याची तयारी करण्यात आली.
त्यानुसार विधानसभा मतदारसंघाद्वारे नियोजन करण्यात आले. दिव्यांग व 85 वर्षांवरील मतदारांना गृहमतदान करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मागील काही दिवसांपूर्वी 12 ड अर्ज भरून घेण्यात आला. त्यानुसार एक हजारांहून अधिक मतदारांनी गृहमतदान करण्यास पसंती दर्शविली. जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी गृहमतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. मतदान केंद्राप्रमाणे गृहमतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आली. गृहमतदानाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क घरूनच बजावला. जिल्ह्यातील अलिबाग 488, कर्जतमध्ये 189, उरणमध्ये 84, पनवेलमध्ये 137, श्रीवर्धनमध्ये 588 मतदारांनी मतदान केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पोलिसांच्या मदतीला होमगार्ड
गृहमतदान करताना कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्यासोबत रायगड जिल्ह्यातील पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या मदतीला 175 होमगार्डदेखील होते.