अलिबाग व मांडवा पोलिसांची संयुक्त कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
। अलिबाग | प्रतिनिधी ।
शिंदे शिवसेना गटातील आमदार महेंद्र दळवी यांच्या थळ गावातच गांजा, गावठी दारू आणि तलवारीचा साठा सापडला आहे. अलिबाग व मांडवा पोलिसांनी शनिवारी (दि.9) सायंकाळी थळ गावातील एका घरावर छापा टाकून कारवाई केली आहे. पुढील कार्यवाही सुरु आहे.
अलिबाग तालुक्यातील थळपासून जवळ असलेल्या कनकेश्वर फाटा परिसरात बेकायदेशीररित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली होती. एका व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती मांडवा पोलिसांना खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली होती. शनिवारी सायंकाळी कनकेश्वर फाटा परिसरात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गांजा दिसून आला. त्याची कसून चौकशी केल्यावर थळमधून एका व्यक्तीकडून गांजा विकत घेतला असल्याची त्याने माहिती दिली. त्यानंतर मांडवा आणि अलिबाग पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून थळमधील एका घरावर कारवाई केली. या छाप्यात गावठी दारू, सुमारे अडीच ग्रॅम गांजा व पाचहून अधिक तलवारींचा साठा सापडला. बेकादेशीररित्या सुरू असलेल्या या धंद्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील कार्यवाही सुरु असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
