बाथरूममध्ये गांजाचा साठा; पळस्पे फाट्यात पोलिसांचा छापा

41 वर्षीय आरोपी अटकेत

| पनवेल | प्रतिनिधी |

पळस्पे फाटा येथील एमएमआरडीए वसाहतीतील एका फ्लॅटच्या बाथरूममध्ये लपवून ठेवलेला गांजाचा साठा पनवेल शहर पोलिसांनी छाप्यात जप्त केला. या कारवाईत 4.255 किलो गांजा आणि विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, सिद्धार्थ रामदास मोरे (41) याला अटक करण्यात आली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना एमएमआरडीए वसाहतीत गांजाचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आर-2, सी विंगमधील फ्लॅट क्रमांक 531 येथे छापा टाकला. घराची झडती घेतली असता बाथरूममध्ये गांजा लपवून ठेवल्याचे आढळले.
पोलिसांनी 4.255 किलो गांजा जप्त केला असून, त्याची किंमत 2 लाख 12 हजार 700 रुपये आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिक पाऊच, स्टेपलर आणि पिना असा साहित्यसाठाही हस्तगत करण्यात आला. आरोपी घरातून गांजाच्या लहान पुड्या तयार करून विक्री करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, हवालदार प्रकाश पाटील, पोलीस नाईक सम्राट डाकी, पोलीस शिपाई अभिजित गडकरी, विशाल दूध आणि महिला पोलीस शिपाई सुशीला पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गांजा कोठून मिळाला आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणातून अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीतील अन्य व्यक्तींचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version