साईडपट्टया उखडल्याने अपघाताचा धोका
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
निगडी ते कोलमांडला मार्गावरील निवळे-कोलमांडला या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या घाटरस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्टया पूर्णपणे उखडल्या आहेत. तीव्र उतार आणि खराब रस्त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
बांगमांडला ते वेश्वी फेरीबोट मार्गावर जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत सोयीचा आहे. तसेच कोलमांडला–कारीवणे–आंबेत मार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व दापोली तालुक्यांकडे जाण्यासाठी ही या जवळच्या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या रस्त्यावर पर्यटकांची वाहने तसेच स्थानिक प्रवासी वाहतूक सातत्याने सुरू असते. मात्र, रस्त्याच्या साईडपट्टया उखडल्याने वाहनांना बाजू देताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः घाटातील वळणदार तीव्र उतार आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा रस्ता इतर जिल्हा मार्ग दर्जाचा असून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून साईडपट्टयांची दुरुस्ती, आवश्यक डागडुजी आणि रस्त्याचे मजबुतीकरण तातडीने करावे, अशी मागणी प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.






