| रसायनी | वार्ताहर |
जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, चौक, वावोशी या भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. या मादक पदार्थ धोरणाविरोधात रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा व पँथर आर्मी यांच्यावतीने खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी व खोपोली पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. सात दिवसांच्या आत जर हे धंदे बंद झाले नाहीत, तर संघटनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सध्याच्या काळात तरुण पिढी ही मादक पदार्थ तसेच अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेली असून अनेकांच्या जीवनासह संसार देखील उद्ध्वस्त झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली, रसायनी व वावोशी या भागातील शाळा कॉलेजच्या परिसरातच गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे. या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना व पँथर आर्मी यांच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार व खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे.