वानखेडे मैदानावर उभारणार सचिनचा पुतळा

| मुंबई | प्रतिनिधी |

सचिन तेंडुलकरने भारतासाठी खेळताना ज्या मैदानात यशाची अनेक शिखरे जिथे पादाक्रांत केली अशा वानखेडे स्टेडियममध्ये आता क्रिकेटच्या देवाचा एक भव्य दिव्य पुतळा बसवला जाणार आहे. क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर 10 वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. 24 एप्रिलला, तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसाला किंवा वर्षाच्या अखेरीस 50 षटकांच्या विश्‍वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, अशी माहिती सध्या समोर येत आहे. वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर आणि एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे, पुतळा कुठे स्थानापन्न करायचा याची पाहणी केली.

वानखेडे स्टेडियममधील हा पहिला पुतळा असेल, तो कुठे स्थानापन्न करायचा हे लवकरच ठरवू. तेंडुलकर भारतरत्न आहे. त्याचं क्रिकेटमधलं योगदान सर्वांना माहिती आहे. त्याच्या 50व्या वाढदिवशी हे एमसीएकडून एक लहानशी भेट असेल. तीन आठवड्यांपूर्वीच सचिनने यासाठी परवानगी दिली आहे.

अमोल काळे, एमसीए,अध्यक्ष

माझ्यासाठी ही एक सुखद भेट आहे. मला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मी स्वतःच्याच पुतळ्याबाबत ऐकून अश्‍चर्यचकीत झालो आहे. माझी कारकीर्द याच मैदानावर सुरू झाली होती. या मैदानावर कधीही विसरली जाणार नाहीत अशा आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण 2011 मध्ये याच मैदानावर अनुभवला होता. भारताने विश्‍वचषक जिंकला होता.

सचिन तेंडूलकर

वानखेडे स्टेडियममध्ये सध्या सचिनचे नाव असलेला स्टँड आहे. एमसीएने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना कॉर्पोरेट बॉक्स आणि फलंदाजीतील दिग्गज दिलीप वेंगसरकर यांच्या नावाचा स्टँड उभारून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होत. देशात क्रिकेटपटूंचे पुतळे स्टेडियममध्ये नाहीत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, आंध्रमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारताचे माजी महान फलंदाज सी के नायडू यांचे असे तीन स्वतंत्र पुतळे आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दिवंगत शेन वॉर्नचा पुतळा आहे. 2011 मध्ये वॉर्नने अनावरण करताना म्हटले होते, हा एक मोठा सन्मान आहे, स्वतःला तिथे पाहणे थोडे विचित्र आहे पण मला खूप अभिमान आहे. हा पुतळा 300 किलोचा आहे! आता भारतातही सचिन तेंडुलकरसाठी असाच भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येत आहे. सचिनने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) आणि (34,357) धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

Exit mobile version