| पनवेल | वार्ताहर|
पनवेल एसटी आगारातील बस मध्ये गर्दीचा फायदा घेवून महिलांचे दागिने चोरणार्या अट्टल गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. एक महिला मुंबई -बोरिवली येथे जाण्यासाठी आपल्या पतीसह बसमध्ये चढत असताना आरोपी कुणाल सुनील गायकवाड (रा. अंबरनाथ) व त्याचा साथीदार पंकज (रा. बदलापुर) यांनी त्यांच्याकडे असलेल्या कटरच्या साहाय्याने सदर महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कट केली व ती बांगडी घेऊन ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार सदर महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करताच पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आगार परिसरात सापळा रचून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा सहकारी पसार झाला आहे. याबाबत आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.