| मुंबई | वृत्तसंस्था |
एकीकडे वाळकेश्वर, मलबार हिल यासारखा उच्चभ्रू मतदारांचा परिसर, तर दुसरीकडे भेंडीबाजार, नागपाडा, डोंगरी यासारखा सर्वसामान्य मुस्लिम मतदारांचा परिसर… कुठे गिरगाव, लालबाग, परळ यासारखी मराठमोळी वस्ती, तर कुठे डॉकयार्ड रोड, रे रोड येथे बाहेरून आलेल्या गरिबांची वस्ती असा सर्व मिळून दक्षिण मुंबई मतदारसंघ बनलेला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स, जिजामाता प्राणीसंग्रहालय यासारखा निसर्गरम्य परिसर आणि मुंबई शेअर बाजार, मंत्रालय, विधानभवन आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला वर्षा बंगला याच मतदारसंघात येतो. काँग्रेसच्या मुरली देवरा आणि मिलिंद देवरा यांनी सहा वेळा या मतदारसंघात झेंडा रोवला असला तरी मागील दोन टर्मपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी आपल्या ताब्यात ठेवला आहे.
यावेळेलाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली असून महायुतीकडून मात्र अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण दिसते. भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांची, शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांची, तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्या नावांची चर्चा असली तरी ऐनवेळी भलताच उमेदवार येथून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला अरविंद सावंत निवडून अले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी जवळपास 85 हजार मते घेतली होती. मनसे महायुतीत आल्यास त्यातील किती मते महायुतीच्या उमेदवाराला मिळतील ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राजकीय समीकरणे
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी आताच्या घडीला दोन ठाकरे यांच्या शिवसेनेकडे, दोन भाजपकडे आणि एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे, तर एक काँग्रेसकडे आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या दोन विधानसभांपैकी वरळी आणि शिवडी या दोन मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांना मानणार्या कट्टर शिवसैनिकांची फौज आहे. भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे चांगलेच प्राबल्य आहे. याशिवाय काँग्रेसच्या अमिन पटेल यांच्याकडे असलेल्या मुंबादेवी विधानसभेतही मुस्लिमांची मोठी संख्या आहे.






