| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातील छत्रपती करिअर अकादमीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीची साक्ष दिली आहे. या अकादमीतील चार विद्यार्थ्यांची विविध पोलीस दलात निवड झाल्याने परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची शिखरे गाठली आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिया सकपाळ हिची पुणे शहर पोलीसमध्ये, रिया मोरे हिची मुंबई शहर पोलीसमध्ये, राखी अंधेरे हिची मुंबई कारागृह पोलीसमध्ये तर हर्ष वाठोरे यांची महाराष्ट्र सुरक्षा फोर्समध्ये, दामिनी रेणोसे, आकांक्षा खापरे विविध प्रकारच्या पोलीस दलात निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर आज कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांची साथ आणि अकादमीचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. या यशस्वी प्रवासात छत्रपती करिअर अकादमीच्या संस्थापिका माधुरी निवास साबळे आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले कठोर प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन निर्णायक ठरले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे अभिनंदन केले.
अकादमीमध्ये विशेषतः ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या आशेने येतात. येथे त्यांना केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक तयारी ही करून घेतली जाते. आर्मी आणि पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले सर्वांगीण प्रशिक्षण दिले जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले आहे. गेल्या दहा वर्षांत या अकादमीने सुमारे 350 विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. होमगार्ड, पोलीस, आर्मी, रेल्वे पोलीस, वनरक्षक आणि राखीव पोलीस दल अशा विविध सेवांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी आपली छाप उमटवली आहे. महाराष्ट्रभरातून विद्यार्थी येथे प्रशिक्षणासाठी येत असल्याचे संस्थापिका माधुरी निवास साबळे यांनी सांगितले. ही निवड केवळ चार विद्यार्थ्यांची नाही, तर त्यांच्या स्वप्नांची, कष्टांची आणि संघर्षाची जिंकलेली लढाई आहे. त्यांच्या यशाने इतर तरुणांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला असून, ‘मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्की मिळते,’ हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
छत्रपती करिअर अकादमीचा अभिमान वाढवणारे यश
