शिक्षक आमदारांचे मागण्यांसाठी आंदोलन यशस्वी; सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद

| मुंबई | प्रतिनिधी |

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विधानपरिषदेतील शिक्षक आमदारांनी गेले दोन दिवस विधानभवन परिसरात आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक घेऊन प्रदीर्घ चर्चा करत सर्व मागण्या समजून घेतल्या.

गेले 2 दिवस विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, सुधीर तांबे, अभिजित वंजारी, विक्रम काळे, जयंत आसगावकर, किशोर दराडे, किरण सरनाईक, आमदार राजेश राठोड यांच्यासह विधिमंडळाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करत होते.

बैठकीत शिक्षण सचिव व शिक्षण अधिकार्‍यांनी शिक्षणमंत्र्यांचे पत्र आमदार महोदयांना दिले. पण त्यावर न थांबता शिक्षणमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याचा आग्रह यावेळी सर्व आमदारांनी धरला. आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी हा आग्रह पूर्ण झाला. यावेळी सन 2012-13 च्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग, तुकड्यांना शंभर टक्के अनुदान लागू करण, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निधीसहीत घोषित करणे, अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान लागू करणे, घोषित त्रुटी पात्र शाळेचा शासननिर्णय निर्गमित करणे, विनाअनुदानित व अंशअनुदानित शिक्षकांना सेवासंरक्षण लागू करणे, 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे तसेच वाढीव पदांना अनुदान मिळावे या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

या संदर्भात शिक्षण मंत्री केसरकर यांनीही तातडीने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. त्यांनी विधिमंडळाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली की अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत दिलेल्या आश्‍वासनानुसार निर्णय घेऊन यातील अधिकाधिक मागण्यांची पूर्तता शासन करणार आहे. यामुळे जवळपास 35 ते 40 हजार शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळणार आहे. आंदोलनाची दखल घेत त्वरीत पुढील पावले उचलल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांचे आभार कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी मांनले आहेत.

Exit mobile version