| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील जिते गावातील शेतकरी अंकुश हरीचंद जाधव यांनी लाल कांद्याची यशस्वी शेती केली आहे. अवघ्या 100 रुपयांच्या बियाण्यापासून तब्बल दोन टन कांद्याचे पीक घेतले आहे. कांद्याच्या यशस्वी शेतीबद्दल जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जाधव यांची शेती नेरळ कशेळे रस्त्याच्या बाजूला आहे. त्या शेत जमिनीपासून काही अंतरावरून उल्हास नदी वाहत असल्याने जिते गावातील अनेक शेतकरी हे उन्हाळयात वेगवेगळ्या प्रकारची शेती करतात. त्यात अंकुश जाधव यांनी कांद्याचे पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. फुरसुंगी जातीचे वाण जाधव यांनी नेरळ गावातील रामदास तुपे यांच्या प्रचिती ऍग्रोमधून फक्त 100 रुपयांचे बियाणे आणले. त्या बियाणामधून आपल्या शेतातील दहा गुंठे जमिनीवर कांद्याची लागवड केली. शेतात वाफे तयार करून त्यावर कांद्याचे बियाणे यांची टोकरणी केली.उल्हास नदीमधून पाणी उचलून त्या भागातील शेतकरी हे शेती करतात. त्याप्रमाणे अगदी अल्प प्रमाणात पाण्याची गरज असलेल्या कांद्याच्या शेतीला पाणी देण्याचे नियोजन केले.
कांद्याच्या शेतीचा कोणत्याही प्रकारचे अभ्यास नसतानादेखील प्रचिती ऍग्रो आणि केवळ स्थानिक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेवून लाल कांद्याची शेती केली. अवगत 100 रुपयांचे बियाणे यापासून जाधव यांनी दहा गुंठे जमिनीतून तब्बल दोन टन म्हणजे 200 किलो कांदा शेतातून मिळाला आहे. जाधव यांनी हा सर्व कांदा आपल्या घराच्यासाठी साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला असून पाणी आणि खताचे नियोजन यावर लाल कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.