रहिवाशांच्या डोक्यावर टांगती तलवार

पनवेलमध्ये 62 इमारती अतिधोकादायक

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल पालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. पालिकेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या धोकादायक इमारतीच्या यादीत 62 इमारतींचा समावेश असून, या इमारतींमध्ये 274 रहिवासी अद्यापही वास्तव्य करत असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांच्या डोक्यावर दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.

पालिकेने या इमारतींची वर्गवारी केली आहे. या वर्गवारीत धोकादायक आणि अतिधोकादायक असे दोन भाग केले असून, सर्वाधिक अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती पनवेल आणि कळंबोली शहरात आहेत. या 62 अतिधोकादायक इमारतीत 274 कुटुंब वास्तव्यास आहेत. पनवेल शहरात जीर्ण व धोकादायक इमारती कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत. पनवेल नगरपरिषदेच्या काळापासून या इमारती उभ्या आहेत. मध्यंतरी गणेश देशमुख पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त असताना धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली. पालिकेने धोकादायक इमारतीच्या आवारात कोणी प्रवेश करू नये, असे बॅनर लावले आहेत. मात्र, या धोकादायक इमारती पाडण्यासाठी पालिका प्रशासन पुढे का धजावत नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अतिधोकादायक इमारतीमध्ये खारघरमध्ये 3, कळंबोलीमध्ये 180, कामोठ्यात 21 आणि पनवेल शहरात 70 कुटुंबं अतिधोकादायक इमारतीत वास्तव्यास आहेत. पालिकेने या इमारतींची यादी जाहीर केली आहे. काही इमारतींचे पाणी आणि वीज जोडणीदेखील बंद करण्यास सुरुवात केली आहे.

राजकीय हस्तक्षेप?
पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींची वीज, पाणी बंद केल्यावर काही रहिवासी राजकीय नेत्यांचे वजन वापरून वीज, पाणी पूर्ववत करत आहेत. अशा इमारतीत दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? अशाप्रकारे राजकीय हस्तक्षेप कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
धोकादायक इमारती पाडणार कोण?
धोकादायक घोषित केलेल्या अनेक इमारती रिकाम्यादेखील झाल्या आहेत. या इमारती पडण्याची वाट बघायची की पालिका या इमारती स्वतः पाडेल, असा प्रश्‍न नागरिक विचारू लागले आहेत.
Exit mobile version