| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्ञानेश कुमार निष्पक्ष नसल्याचा आरोप केला आहे. विरोधकांना निष्पक्ष निवडणूक आयोग हवा असून, देशात कथित मतचोरी होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी शनिवारी (दि.31) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमरांविरूद्ध प्रतीकारात्मक महाभियोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रतीकात्मक महाभियोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगे यांनी, केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. 2014 पासून सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, खासदारांना फोडणे, राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणे आणि सरकार पाडण्याचे प्रकार झाले. याशिवाय निवडणूक रोखे, ईडी आणि सीबीआय यांचाही वापर करण्यात आला. आता मतांची चोरी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, इंडिया आघाडीकडून दि.1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ही रॅली काढण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. या रॅलीसाठी काँग्रेस आणि मित्रपक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसने या सभेला 10 लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा केला आहे.
इंडिया आघाडीचा प्रतिकात्मक महाभियोग
