भव्य मोर्चा काढण्याची घोषणा; आता देशभरात आंदोलनांचं वादळ!
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरच्या निर्णयासह आणखी काही निर्णय मनमानीपणे घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरातून ज्ञानेश कुमारांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.30) इंडिया आघाडीची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित गोंधळाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत निवडणूक आयुक्त ज्ञानेश आणि केंद्र सरकारविरोधातील रणनीती निश्चित करण्यात आली आहे. आता इंडिया आघाडीच्यावतीने 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 6 ऑक्टोबर रोजी सर्व विरोधी पक्षाचे नेते आणि खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहोत, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की, इंडिया आघाडीच्यावतीने 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील. 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान आम्ही जिल्हास्तरावर लोकशाही वाचवा पदयात्रा काढणार आहोत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणार आहोत. आम्ही ही मोहीम का राबवत आहोत याबद्दलही जनतेत जनजागृती करणार आहोत, अशी माहिती खरगे यांनी सांगितली.
6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगावर मोर्चा
आम्हाला आजच निवडणूक आयोगावर मोर्चा काढायचा होता. मात्र, सर्व खासदारांना पुन्हा बोलावून हे आंदोलन योग्य प्रकारे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता या मोर्चासाठी 6 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्यसभेचे आणि लोकसभेचे सर्व सदस्य, मग ते कोणत्याही पक्षाचे असो आणि ज्यांना देशातील लोकशाहीचं रक्षण करायचं आहे अशा सर्वांना या मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण आम्ही देणार आहोत. 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांचे सर्व खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढतील, अशी माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.
विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार
सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम्ही विरोधी पक्षांचे नेते ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. आम्हाला भेडसावणाऱ्या समस्या आणि घटनात्मक अडथळ्यांबाबत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देणार आहोत. विविध संस्था कशा प्रकारे ताब्यात घेतल्या जात आहेत, याबाबत राष्ट्रपतींना अवगत करणार असून सर्व विरोधी पक्षाचे नेते ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत, अशी माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. चौथ्या टप्प्यात पाच मोठ्या सभांचा समावेश असेल. त्यांच्या तारखा आणि ठिकाणे निश्चित करून सर्वांना नंतर कळवणार आहोत, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे.
नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा
इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत निवडणूक आयोगाविरोधात देशभरात वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पुढील एका महिन्यात देशभरातील पाच मोठ्या शहरात मोर्चे काढून 1 नोव्हेंबरला दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही विरोधकांनी सांगितली आहे.







