| सुतारवाडी | प्रतिनिधी |
कोलाड नाक्यावर अनेक वर्षापासून वन विभागाची तपासणी चौकी आहे. आता ती मोठ्या समस्येच्या कचाट्यात सापडली आहे. तपासणी चौकी आता असून, नसून सारखी असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोलाड नाक्यावर गेल्या अनेक वर्षापासून सुमारे सहा ते नऊ गुंठे शासनाची जमीन असलेल्या जागेत तपासणी चौकी बांधलेली आहे. माणगावकडून येणारी वाहतूक , त्याचप्रमाणे रोहा नागोठणेकडे जाणारी अवैद्य लाकडाची वाहतूक या ठिकाणी तपासले जायची. मात्र, आता पनवेल ते इंदापूर रस्ता रुंदीकरणात या तपासणी चौकी समोर मोठा पूल झाला असून ही तपासणी चौकी खाली एका बाजूला दिसत आहे. वाहतूक आहे ती पुलावरून वळविण्यात आल्यामुळे जर एखादी लाकडाची अवैध वाहतूक गेली तर काहीच थांग पत्ता लागत नाही. काही दिवसांपूर्वी खांब नागोठणे नजीक लाकडाची अवैद्य वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. त्यामुळे ही तपासणी चौकी आता असून, नसून सारखेच झाली आहे. ही तपासणी चौकी इतरत्र हलवली तर अवैद्य लाकडाची वाहतूक करणारे ट्रक जप्त केले जातील अन्यथा दिवसाढवळ्या येथून अवैद्य वाहतूक होत राहील.







