मुंबई – गोवा महामार्गावर टँकरने घेतला पेट

। माणगाव । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि.20) रात्री माणगाव तालुक्यातील घोटवळ गावाजवळ ज्वलनशील रसायन भरलेल्या टँकरने अचानक पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व स्थानिक बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी मार्गावरील वाहतूक काहीवेळ थांबविण्यात आली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरातमधील अदानी हाझिरा पोर्ट लिमिटेड कंपनीच्या एसीएन लिक्विड भरलेला टँकर मुंबई-गोवा महामार्गवरून चिपळूण येथील लोटे परशुराम एमआयडीसीत जात होता. यावेळी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान भुवन गावनजीक रस्ता दुभाजकाजवळ चालक रामदान याने वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला. परंतु ब्रेक व क्लचमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं जाणवल्यामुळे चालकाने रस्त्याच्या बाजूला टँकर थांबवून पाहिले तेव्हा टँकरच्या मागील बाजूस आगीने पेट घेतल्याचे दिसून आले.

त्यानंतर चालकाने घोटवळ गावाच्या स्टॉपवरील पंजाबी ढाबा हॉटेलमध्ये जाऊन उपस्थिताना घटनेची माहिती दिली. तेथील ग्रामस्थांनी रेस्न्यू टीमच्या सागर दाहिंबेकर या तरुणाला कॉल करून याबाबत माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता टीम कोलाड व फायर ब्रिगेड धाटाव एमआयडीसी घटनास्थळी पोहचले. त्यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. रामदान ड्रायव्हरच्या चलाखीने मोठा अनर्थ टळला. याबाबत टीम एसव्हीआरएसएस कोलाड व फायर ब्रिगेड कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version