सौराष्ट्राविरुद्धची रणजी लढत रोमहर्षक स्थितीत
| सोलापूर | वृत्तसंस्था|
महाराष्ट्र-सौराष्ट्र यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील ‘अ’ गटातील लढत दुसऱ्या दिवसअखेरीस रोमहर्षक अवस्थेत आली आहे. हितेश वाळुंजच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राचा दुसरा डाव 164 धावांवर आटोपल्यामुळे महाराष्ट्रासमोर चौथ्या डावात विजयासाठी 208 धावांचे आव्हान उभे ठाकले. महाराष्ट्राच्या संघाने 5 बाद 104 धावा केल्या असून आता आणखी 104 धावांचे लक्ष्य त्यांना ओलांडावयाचे आहे. लढतीचे दोन दिवस शिल्लक असून याप्रसंगी दोन्ही संघांना विजयाची नामी संधी असणार आहे.
महाराष्ट्राच्या संघाने शनिवारी 7 बाद 116 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. महाराष्ट्राचा पहिला डाव 159 धावांवरच आटोपला. धमेंद्र जडेजाने 61 धावा देत चार फलंदाज बाद केले. युवराज दोदियाने 45 धावा देत तीन फलंदाजांना गारद केले. पार्थ भूतने 25 धावा देत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. सौराष्ट्राच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही सूर गवसला नाही. हितेश वाळुंजच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे सौराष्ट्राचा दुसरा डाव 164 धावांवर गारद झाला. विश्वराज जडेजाने 39 धावांची, चिराग जानीने 43 धावांची व जयदेव उनाडकटने 45 धावांची खेळी केली. हितेशने 70 धावा देत आठ फलंदाजांना बाद केले. महाराष्ट्रासमोर विजयासाठी 208 धावांचे आव्हान उभे ठाकले, पण महाराष्ट्राच्या मुख्य फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. युवराज दोदिया, पार्थ भूत यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. अंकित बावणेने 25 धावांची व विशांत मोरेने 21 धावांची खेळी केली. आता सिद्धांत म्हात्रे व तरणजीत ढिल्लो हे फलंदाज खेळपट्टीवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र- पहिला डाव 202 धावा आणि दुसरा डाव 164 धावा (विश्वराज जडेजा 39, प्रेरक मंकड 21, चिराग जानी 43, जयदेव उनाडकट 45, हितेश वाळुंज 8/70) वि. महाराष्ट्र – पहिला डाव 159 धावा आणि दुसरा डाव 5 बाद 104 धावा (कौशल तांबे 16, ओम भोसले 16, अंकित बावणे 25, विशांत मोरे 21, सिद्धार्थ म्हात्रे खेळत आहे 11, तरणजीत ढिल्लो खेळत आहे 6, पार्थ भूत 2/24, युवराज दोदिया 2/38).
केदार आजारी, तरीही खेळण्याची शक्यता
महाराष्ट्राचे पाच फलंदाज बाद झाले. अद्याप अनुभवी केदार जाधव फलंदाजीला आला नाही. याबाबत विचारणा केली असता सूत्रांकडून सांगण्यात आले की, हरियाना येथील सामन्यात पाच डिग्री सेल्सियसमध्ये आम्हाला खेळावे लागले. शरीरावर याचे परिणाम जाणवू लागले. केदारला सर्दी, घसा खवखवणे याचा त्रास होत आहे. डॉक्टर तपासणी करतील, पण तो मैदानात उतरेल, असे पुढे त्यांनी सांगितले.