एका शिक्षकाचे अनोखे मित्र प्रेम

51 वेळा रक्तदान

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

मित्र -मैत्रिणीच्या मैत्री दिनाला किंवा वाढदिवशी एकमेकांना भेट वस्तू, शुभेच्छा पत्र किंवा संदेश देवून शुभेच्छा देतात. परंतू पालीतील विक्रम काटकर हे शिक्षक मागील अनेक वर्षांपासून रक्तदान करुन आपल्या मित्रांना मैत्री दिनाचे किंवा त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान रुपी शुभेच्छा देतात. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 51 वेळा रक्तदान केले आहे. त्यांचा हा विधायक उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तसेच मैत्रीचे धागे आणखी भक्कम होत आहेत.

विक्रम काटकर पालीतील ग.बा. वडेर हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. आपले मित्र व नातेवाईक यांचे वाढदिवस शिवाय मैत्री दिनाचे औचित्य साधून विक्रम काटकर रक्तदान करतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी रक्तदान केले आहे. आणि मैत्रिदिनाच्या शुभेच्छा आपल्या मित्रांना दिल्या आहेत. याबरोबरच कोणाला तातडीने रक्ताची आवश्यकता असल्यास देखील ते रक्तदान करतात. त्यांनी रक्तदान केल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय रक्तदान केल्यावर मिळणार्‍या कार्डच्याद्वारे संपर्कातील अनेकांना मोफत रक्त सुद्धा मिळाले आहे.

आतापर्यंत 51 वेळा रक्तदान केले आहे. मित्र व जवळचे नातेवाईक यांच्या जन्मदिनी तसेच मैत्रिदिन व काही महत्वाच्या दिवसांचे औचित्य साधून रक्तदानच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा संकल्प केला आहे. यातून रक्तदान चळवळी विषय जाणीव जागृती वाढत आहे. शिवाय मैत्रीचे नाते देखील घट्ट होते. तसेच नवनवीन लोक स्वतःहून रक्तदान करण्यासाठी पुढे येवून अनेकांचा जिव वाचेल असा विश्‍वास वाटतो.

विक्रम काटकर,
शिक्षक,
रक्तदानकर्ते

अशा प्रकारे कोणी शुभेच्छा देवू शकतो याची कल्पनासुद्धा करु शकत नाही. लोककल्याणकारी ध्येय डोळयासमोर ठेवून विक्रमने हे अभियान राबवित आहे याचा आम्हा सर्व मित्रांना अभिमान वाटतो. त्याचा हा संकल्प अविरत सुरु राहो यासाठी त्याला खुप शुभेच्छा व आभार.

टिळक खाडे,
शिक्षक,
काटकर यांचे मित्र
Exit mobile version