| चिरनेर | प्रतिनिधी |
पोलिस दलात 1995 पासून पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झालेले रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील गोकुळनगर या दुर्गम अशा गावचे भूमिपुत्र असलेले नवीमुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले संजीव दत्तात्रय धुमाळ यांना पोलिस दलात मागील 30 वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.
पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्यावर 1 वर्षाच्या नाशिक येथील प्रशिक्षणानंतर सर्वप्रथम मुंबई येथील सांताक्रूझ पोलिस ठाणे नंतर मुंबई गुन्हे शाखा, एल – बांद्रा व त्यानंतर खंडणी विरोधी कक्षात 18 वर्षे संजीव धुमाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली योग्यतेने आपलें कर्तव्य केले असून, महत्वाच्या गुन्ह्यांची उकल करून अंडरवल्डरच्या बऱ्याच गुन्हेगारांवर धडक कारवाई केली आहे. नवीमुंबई आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या वाशी व न्हावाशेवा पोलिस ठाणे येथे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे काम चोख बजावले आहे.आणि सध्या रबाळे पोलिस ठाणे येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कर्तव्य बजावत असून, नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपलें कौशल्य पणाला लावून सर्वात जास्त बूथ असलेले रबाळे पोलिस ठाणे असतांना देखील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. 30वर्षाच्या सेवेमध्ये सुमारे 250 बक्षीसांचे मानकरी ठरलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्याने नवीमुंबई पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत.