। महाड । प्रतिनिधी ।
रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जात असताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा रायगडजवळील पुनाडे घाटात भीषण अपघात झाला. अवघड वळणावर टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल झाल्याने वाहन उलटले. या अपघातात प्रवास करणाऱ्या 18 प्रवाशांपैकी पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यातील तिघांना पुढील उपचारासाठी माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अहिल्यानगर येथून टेम्पो ट्रॅव्हलरमधून 18 शिवभक्त रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून सायंकाळी हे शिवभक्त माणगाव मार्गे पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघाले असताना रायगड–माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात अवघड वळणावर अचानक टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाला वाहनावरील नियंत्रण मिळवता आले नाही आणि टेम्पो उलटून अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पाच प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
जखमी झालेल्यांमध्ये राहुल नागरे, अमोल फडतरे आणि आसाराम तोगे या तीन शिवभक्तांचा समावेश असून त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोरे यांनी दिली. उर्वरित जखमी शिवभक्तांवर पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ उपचार करण्यात आले.
पुनाडे घाटात टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात; पाच जण जखमी
