केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षाच
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते, विशेष करुन पावसाळ्यामध्ये आपत्तची टांगती तलवार कायम असते. बचावकार्यासाठी कायमस्वरुपी एनडीआरएफचा तळ उभारण्याला अद्यापही केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक तैनात झाले आहे.
महाडमध्ये दाखल झालेल्या पथकामध्ये तीस जवानांचा समावेश असून, पथकाचे नेतृत्व निरीक्षक दिलीपकुमार यांच्याकडे आहे. मदत आणि बचावकार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा आणि साहित्याने हे पथक सुसज्ज आहे. पावसाळ्यात महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांवर दरडी कोसळणे, महापूर अशा नैसगिक आपत्तीचे भय असते. अशा घटना घडल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि मदतकार्य सुरु करता यावे यासाठी पावसाळ्यात एनडीआरएफ तैनात करण्यात येत आहे.
सन 2021 मध्ये महाड शहर आणि तालुक्यात दरड दुर्घटना आणि महापुराने थैमान घातले होते. या उपविभागाला वादळ, चक्रीवादळ, महापूर आणि दरडी कोसळण्याचा असलेला धोका विचारात घेऊन महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफ तळ मंजूर करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने जागादेखील उपलब्ध करून दिली आहे. मात्र, केंद्र शासनाने अजूनही त्याला परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी कायमस्वरुपी आपत्ती उद्भवत नसल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ऐवजी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) उभारण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे याआधीच जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.