शिघ्रे-गारंबी दरम्यान आपत्तीची परीक्षा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील शिघ्रे-गारंबी दरम्यान रस्त्यावर वाहनाचा भीषण अपघात झाला आहे आणि तातडीने सेवा उपलब्ध करण्यात यावी, असे फोन मुरुड मधील पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, संजीवनी हॉस्पिटल, रुग्णवाहिका, नगर परिषद तसेच ग्रामपंचायत कार्यालयात खणाणताच आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली अन् बारा ते अठरा मिनिटांत अपघात स्थळी सेवा उपलब्ध झाली. यात मुरुड नगरपरिषदेची अग्नीशमन दलाची गाडी अवघ्या बारा मिनिटांत अपघात स्थळी दाखल झाली.

रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उरण येथील आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण दलातर्फे मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीत गारंबी धरण रस्त्यावर वाहनाचा भीषण अपघात झाला असल्याचे मॉकड्रिल घेण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच सर्व प्रथम मुरुड नगरपरिषदेची अग्नीशमन दलाची गाडी, कर्मचारी अवघ्या बारा मिनिटांत हजर झाले. ग्रामीण रुग्णालय रुग्णवाहिका, संजीवनी हॉस्पिटल रुग्णवाहिका, मुरुड पोलीस, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, ग्रामपंचायत सरपंच, कर्मचारी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी हे तात्काळ अपघात स्थळी दाखल होऊन आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण दल (उरण) प्रमुख शशिकांत शिरसाट, मुरुड टिमचे प्रमुख तुफैल दामाद, मकसुद कबले, मोअल्लीम हसवारे, हंजला कबले, हन्नान अर्जबेगी या मॉकड्रिल मधे सहभागी झाले होते.

Exit mobile version