हक्कासाठी वेलटवाडी येथील ठाकूर समाज एकवटला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
डोंगरभागात राहणार्या वेलटवाडी येथील ठाकूर समाजाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र आजही या समाजाची मोठी फरफट होत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी वेलटवाडी येथील ठाकूर समाज एकवटला असून मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार असा इशारा उपोषणाद्वारे निवेदनातून दिला आहे.
खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी डोंगर भागातील ग्रामस्थ असून राहत असलेल्या जागेत 4ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. जमिनीला भेगा पडल्या. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने या डोंगराच्या पायथ्याजवळ पत्र्याच्या शेडमध्ये स्थलांतरित केले. या शेडमध्ये सुमारे 125 हून अधिक नागरिक राहत आहेत. कोरोना काळात वन विभागाच्या जमिनीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कच्च्या कुडांच्या झोपड्या बनविल्या. मात्र आजतागात पुनर्वसन करण्यास प्रशासन उदासीन ठरल्याची खंत ठाकूर समाजाने व्यक्त केली. प्रशासनाकडून पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. गेल्या पाच वर्षापासून या समाजाची फरफट सुरु आहे.
सध्या पावसाळी हंगाम आहे. पावसामुळे राहत असलेल्या कच्च्या घराच्या जमिनीला ओलावा निर्माण होत आहे. त्यामुळे दंश करणार्या प्राण्यांचा धोका निर्माण झाला असून या ठिकाणी पाणी, विजेचा अभावदेखील मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे 22 कुटूंबियांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.
राहत असलेली जागा मिळावी. पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी वेलटवाडी येथील ग्रामस्थ, महिलांनी एकत्र येऊन लढा पुकारला आहे. सर्वांनी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. राहत्या ठिकाणी गट क्रमांक 393 मध्ये पुनर्वसन करून मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या लढ्यात संदेश गडखळ, शेखर गडखळ, लक्ष्मण शिद, संजय कास्टे, एकनाथ शिंदे आदी शेकडो ग्रामस्थ, महिला सहभागी झाले आहेत.