तीन वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्‍याचार

| मुंबई | प्रतिनिधी |

चांदिवलीच्या संघर्षनगर विभागातील झोपडपट्टीमध्ये एका 15 वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीवर तिच्या घरात जाऊन अत्‍याचार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी विधी संघर्ष बालक विरोधात अत्‍याचाराचा गुन्हा दाखल केला असून, त्याला आज ज्यूयेनाईल कोर्टात हजर करण्यात आले.

पीडित मुलगी आणि अत्याचार करणारा मुलगा शेजारी शेजारी राहतात. मंगळवारी (दि.13) रोजी या मुलीचे आई-वडील बाहेर गेले असता, पीडित मुलगी आणि तिची छोटी बहीण घरी असताना हा अल्पवयीन मुलगा त्यांच्या घरात घुसला. त्या मुलीवर अत्याचार करून पळून गेला. घडलेली घटना तीन वर्षीय पीडित मुलीने तिची आई घरी आल्यावर तिला सांगितली. या नंतर पीडित मुलीच्या आईने त्या मुलाच्या घरी जाऊन झालेला प्रकार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांना सांगितला. या नंतर पीडित मुलीच्या वडिलांनी साकीनाका पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी पीडित मुलीला राजावाडी रुग्णालय वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमदर्शनी अत्याचार झाल्याचे पोलिसांना सांगताच पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version