| पनवेल | वार्ताहर |
अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची व त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहून प्रसूत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पीडित मुलगी आणि आरोपीमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातूनच आरोपी तरुणाने गत फेब्रुवारी महिन्यामध्ये पीडित मुलीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने तिला अंबरनाथ येथून मोटारसायकलने तळोजा येथील बहिणीच्या घरी नेले. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. पीडितेने लैंगिक अत्याचार आणि गरोदर राहिल्याची माहिती आपल्या आई-वडिलांना सांगितली नाही. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर ती गरोदर असल्याचे कुटुंबीयांना समजले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पीडिता प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याने कुटुंबीयांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी तळोजा पोलिसाकडे वर्ग केला आहे.







