सेवा सप्ताहनिमित्त विविध उपक्रम
| नागोठणे | प्रतिनिधी |
लायन्स क्लब इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेकडून जगभर 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानुसारच रायगड जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेल्या नागोठणे लायन क्लबकडूनही सेवा सप्ताहनिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग असलेल्या पर्यावरण विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन नागोठणे लायन्स क्लबकडून शुक्रवारी (दि.3) करण्यात आले होते.
या रॅलीची सुरुवात नागोठण्यातील गवळ आळी येथील श्री राधाकृष्ण व साईबाबा मंदिरापासून सकाळी 10.45 वाजता करण्यात आली. त्यानंतर ही रॅली गांधी चौक, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, खुमाचा नाका मार्गे पुन्हा श्री राधाकृष्ण मंदिरात आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत पर्यावरणविषयक जागृतीपर अनेक घोषणा देण्यात आल्या.
नागोठणे लायन्स क्लबची टीम, एस.डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका स्नेहा काटले, स्मिता पाटील यांच्यासह इयत्ता 9 वी व 10 वीचे 46 विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत जनजागृतीपर संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. तसेच, या रॅलीत लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीसाठी भारतीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर जैन, शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, मुख्याध्यापिका अमृता गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.







