| रत्नागिरी | प्रतिनिधी |
एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शाश्वत मच्छीमार हक्क संघाने पुढील आठवड्यात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या लहान नौकांना मिळणाऱ्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. अवैध मासेमारी नजरेत येऊ नये म्हणून आता रात्रीबरोबरच दिवसाही मासेमारी केली जात आहे. मासेमारी करून या नौका संध्याकाळी राजिवडा व मिरकरवाडा जेटीवर मासळी उतरवतात, हा प्रकार पारंपरिक मच्छिमारांच्या नजरेस आला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या बेकायदेशीर मासेमारीवर तोडगा काढण्यासाठी शाश्वत मच्छीमार हक्क संघाची तालुका स्तरावर नुकतीच बैठक झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष रणजित भाटकर यांनी सांगितले की, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढील आठवड्यात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक दिली जाईल. अधिकारी या अवैय मासेमारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, भाटकर यांनी अधिकाऱ्यांना समुद्रात नेऊन ही अवैध मासेमारी कशी चालते, हे प्रत्यक्ष दाखवून देण्याची तयारी दर्शवली आहे.







