भाव घसरले; अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
हाती आलेले पीक अतिवृष्टीत वाहून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. त्यात बाजारात पिकाच्या भावात अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. त्याशिवाय निर्यातीतील अनिश्चित धोरणांमुळे उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा नुकसानीत गेला आहे. त्यातच परदेशातील आयातबंदीमुळेही कांद्याचे भाव घसरवले आहेत.
दसरा-दिवाळीच्या हंगामात शेतकरी साठवलेल्या कांद्याची विक्री करून नफा कमावतात. सोलापूर जिल्ह्यातून दिवाळीच्या सुरुवातीला नवीन हंगामाचा कांदा मुंबई एपीएमसीत येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम काहीसा लांबणीवर गेल्याचे मुंबई एपीएमसीतील व्यापारी सांगत आहेत. त्याशिवाय कृषी विभागाच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सुमारे 40 हजार हेक्टर कांदा पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे खरीप आणि लेट खरीप पिकाचे 80 टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंत बाजारात कांद्याची आवक कमी राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येतो आहे.







