। पॅरिस । वृत्तसंस्था ।
महिला सांघिक विभागात अपयशी ठरलेल्या दीपिका कुमारी हिने वैयक्तिक प्रकारात शानदार कामगिरी केली आहे. तिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये बुधवारी झालेल्या सलग दोन लढतींमध्ये विजय साकारत पुढल्या फेरीत प्रवेश केला आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर जर्मनीच्या मिशेल क्रोपेन हिचे आवाहन असणार असून 3 ऑगस्ट रोजी ही लढत रंगणार आहे.
दीपिका कुमारी हिला पहिल्या लढतीत कडव्या संघर्षानंतर विजय साकारता आला. यामध्ये तिला इस्तोनियाच्या रीना परनात हिचा सामना करावा लागला. पहिला सेट 29-28 असा जिंकत दीपिकाने दोन गुण कमवले. पण, दुसर्या सेटमध्ये रीना हिने 27-26 असे यश मिळवताना बरोबरी साधली. तिसर्या सेटमध्ये दोघींना 27 गुणांची कमाई करता आली. चौथ्या सेटमध्ये रीना हिने 27-24 असा विजय साकारत आपली गुणसंख्या पाचवर नेली. पाचव्या सेटमध्ये दीपिकाने सोडलेल्या तीनही बाणांनी दहाचा लक्ष्यभेद केला. त्यामुळे तिला 30 गुणांची कमाई करता आली. रीना हिला 27 गुणांवरच समाधान मानावे लागले. अखेर दोन खेळाडूंमध्ये 5-5 अशी बरोबरी साधली. त्यामुळे निकाल लागण्यासाठी शूटऑफचा अवलंब करावा लागला.
दीपिकाकुमारी हिने शूटऑफमध्ये रोमहर्षक विजय साकारला. तिने सोडलेल्या बाणामुळे नऊ गुणांची कमाई करता आली. रीना परनात हिने आठ गुणांची कमाई केली. अखेर भारताच्या कन्येने या लढतीत 6-5 असा विजय संपादन करीत पुढे पाऊल टाकले. दीपिकाने पुढील फेरीत नेदरलँड्सच्या क्विंटी रोएफिन हिच्यावर 6-2 अशी मात केली. दीपिकाने तीन सेट जिंकून एकूण सहा गुणांची कमाई केली.