नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा
। अलिबाग । संतोष राऊळ ।
अलिबाग तालुक्यातील चौल बॉक्स क्रिकेट असो. च्या मान्यतेने, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या सहकार्याने व जिजामाता जान्हवी तळे चौल तर्फे नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा शनिवारी (दि.28) चौल जान्हवी तळे येथील पटांगणावर पार पडल्या. या मर्यादित 3 षटाकांच्या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. तर, चुरशीच्या अंतिम सामन्यात आग्रावच्या निनाद स्पोर्ट्स संघाने भोवाळेच्या दत्तकृपा संघाला नमवत बाजी मारली आहे.
या स्पर्धेदरम्यान, शेकाप युवा नेते सचिन राऊळ, अभिजित वाळंज, नितीन सारंग, हेमंत पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाचे संस्कार म्हात्रे यांची विशेष उपस्थिती लाभली. स्पर्धेतील अंतिम सामन्यावेळी अभिजीत वाळंज यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. यावेळी भोवाळेच्या दत्तकृपा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आग्राव संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 3 षटकांत 19 धावा करत दत्तकृपा भोवाळे संघासमोर 20 धावांचे आव्हान ठेवले होते.
या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस वाढली होती. याआधी आग्रावच्या निनाद स्पोर्ट्सने संपुर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते. त्यामुळे तेच जिंकतील अशी आशा सर्वांना लागून होती. अंतिम सामन्यातील तिसरे षटक आग्रावच्या शैलेश पाटील याने टाकले. त्याच्या शेवटच्या चेंडूवर दत्तकृपाला जिंकण्यासाठी दोन धावांची गरज होती. मात्र, शैलेश पाटील याने कुशलतेने टाकलेल्या या चेंडूवर दत्तकृपाला फक्त एकच धाव काढता आली. आणि आग्रावच्या निनाद स्पोर्ट्सने अंतिम सामन्यात बाजी मारली. त्यामुळे, भोवाळेच्या दत्तकृपा संघाला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
तसेच, या स्पर्धेत जय हनुमान पाडा चौल व सिद्धीविनायक बीबी चौल यांना अनुक्रमे तिसर्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. विजयी संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक राजू खराडे, प्रकाश म्हात्रे, प्रकाश शेणवईकर व राजेंद्र वर्तक यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सामनावीर म्हणून आग्रावच्या शैलेश पाटील याला विनय म्हात्रे मित्र मंडळाकडून बक्षिस स्वरूपात सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. तर, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिजामाता जान्हवी तळे संघाचे केतन म्हात्रे, रीतेश वर्तक, प्रसाद पाटील, शुभम पाटील, रोहन म्हात्रे, अक्षय शेणवईकर, निकेत शिंदे, ओमकार खारकर, चेतन सरदार, रूपेश खारकर, स्वराज पाटील व आर्यन वर्तक यांनी विशेष मेहनत घेतली.