होळीच्या दिवशी सामूहिक मासेमारीची परंपरा

उरणमधील गावच्या सामाईक तलावावर मासेमारी

| उरण | वार्ताहर |

उरण पूर्व विभागातील ग्रामीण भागात आज ही संस्कृतीचा ठेवा कायम जपला गेला आहे. होळीच्या दिवशी नटून थटून थाटात होळी साजरी करून दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवणावर ताव मारण्याची पद्धत सर्वत्र आहे. मात्र याच दिवशी पूर्व विभागातील गावात मात्र खास गावात तळे मारण्याचा कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम म्हणजे सामूहिक मासेमारी. सदर मासेमारी लोकांना एकत्र आणण्यासाठी एक वेगळा प्रयत्न फार पूर्वापार सुरू आहे.

उरण पूर्व विभागातील कळंबुसरे, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, आवरे गोवठणे, पिरकोण, पाणदिवे कोप्रोली, खोपटे या गावात विस्तीर्ण तलाव लाभलेला आहे, गावातील सर्व प्रथा-परंपरांचे केंद्रस्थान म्हणजे हा तलाव, अगदी लग्नापासून गणपती विसर्जनापर्यंत परंपरा जपण्याच काम गावचा तळा करतो. होळी व धुळवडीच्या दिवशी गावात तळा मारण्याचा कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम म्हणजे सामूहिक मासेमारी करणे असते. गावातील सर्वजण मिळून एकाच वेळेस मासे पकडण्या साठी जमतात होळी किंवा धूळवड या दिवसामधून मांसाहार करण्याचा वार जोखला जातो.

तळा मारण्याच्या उत्सवाची लगबग आधीच्या दिवसापासूनच सुरू होते व गावातील बरेचसे लोक इतर गावांतील लोक ‌‘आसू’ मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. कारण, तळा मारण्यासाठीचा एकमेव नियम म्हणजे फक्त आसूचा वापर करणे असते. कधी कधी मोठं जाळी वापरली जाते, त्याला यंडी म्हणतात. ती दोन व्यक्ती वापरू शकतात. आसू हे एकाच व्यक्तीला वापरता येण्याजोगे मासेमारीचे साधन आहे. लवचिक वेताच्या दांडी वाकवून त्याभोवती विणलेले मासे पकडण्याचे जाळे म्हणजे आसू होय, गावातील सर्वच कुटुंबांकडे हे आसू असते.

तळा मारण्याआधी गावात ‌‘हाक मारली काय?’ त्याला शुद्ध भाषेत दवंडी असे म्हणता ‌‘तळा मारण्याचा’ दिवस व वेळ निश्चित करून. दुसऱ्या दिवशी सकाळी सात आठ वाजल्यापासूनच तळ्यावर गर्दी जमा होऊ लागते.

हातात आसू आणि मासे साठवण्यासाठी पिशवी, बरणी, डोबुकरी आणली जात असून, पकडलेले मासे सांभाळण्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती असते. शिवाय प्रत्यक्ष मासेमारांसह उत्साही प्रेक्षकही तळ्याकाठी जमलेले असतात. मासेमारी आधी नारळ अर्पण केला जातो. फोडल्याच कळलं की तळ्याच्या काठावरील लोक तळ्यात प्रवेश करून मासे पकडण्यास सुरुवात करतात. एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक पाण्यात उतरल्याने पाणी ढवळले जाते व मासे वर येऊ लागतात. कटल्यांसारखे मोठे मासे मिळतात. तसेच सर्व जातींचे मासे एकत्र केले जातात व पकडणाऱ्याना त्यांचा वाटा दिला जातो, त्यानंतर गावात पुरुष असतील, त्याप्रमाणे मासे वाटले जातात व जिताडा शिवरा यासारख्या मोठ्या माशांचा लिलाव केला जातो.

वर्षानुवर्षाची परंपरा
गावकीच्या वतीने माशांचे बी पाण्यात सोडण्यात येते, त्यामुळे कटला, जिताडा, शिवरा हे मासेही सापडतात. तसा मासेमारीसुद्धा शेतीप्रमाणेच बेभरवशाचा प्रकार असल्याने ‌‘तळा मारताना' आपले जाळे रिकामे राहण्याचे प्रसंगही येतात. कधीकधी अधिक मिळवलेले मासे नातेवाईक व मित्र मंडळी यांना भेट म्हणून दिले जातात. या दिवशी गावात प्रत्येक घरात माशांची मेजवानी असते. तळा मारण्याची परंपरा गावात गेली कित्येक वर्षांपासून रूढ असल्याने आज ही होळीच्या दिवशी सर्व लोक आपली रुढी परंपरा यांचे जतन करता तलावातील मासेमारीतून दिसून येत आहे.

आगरी समाज हा मोठ्या प्रमाणात मांसाहारी असा समाज आहे, त्यामुळे इथे धुळवडीच्या दिवशी घरोघरी मांसाहारी जेवणाचा बेत असतो. वर्षभर जपणूक केलेल्या मासळीची गावच्या तलावात धुळवडीच्या दिवशी सकाळी संपूर्ण ग्रामस्थ मासेमारी करतात. या तलावातील मासे घरी घेऊन जातात. अर्थात, हे गोड्या पाण्यातले मासे असले तरी चविष्ट असतात.

अशोक पाटील,
ग्रामस्थ
Exit mobile version